दि. 22 (पीसीबी) – संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाही, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालवली आहे. हे म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता पदावरून नुकतंच हकालपट्टी झालेल्या किशोर तिवारी यांचं. एवढेच नाही तर शिवसेनेच्या प्रवक्ता पदावरून माझी हकालपट्टी एबीपी माझा मुळे झाली. मी झिरो अवर कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो, 8:30 वाजता शो संपला आणि 8:45 ला पक्ष प्रवक्ता पदावरून माझ्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याचा गौप्यस्फोटही किशोर तिवारी यांनी केला आहे.
एवढेच नाही तर निवडणुकीच्या काळात प्रवक्ता असतानाही मला प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून रोखण्यात आले होते. कारण मुंबईत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी मुस्लिमांचा मतदान आवश्यक होते. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडण्यापासून पक्षाकडून थांबवण्यात आल्यास गंभीर आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे.
कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, पक्षाची अशी भूमिका आत्मघाती
नागपुरात येऊन संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि दुसऱ्या दिवशीपासून पक्षाला गळती लागली. नागपुरातून आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेमुळेच पक्ष सोडण्याचं तिवारी म्हणाले. राजन साळवी पक्ष सोडून गेल्यानंतर ही पक्षात कोणालाही जाग आलेली नाही. ज्याला जायचं आहे ते जा, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, पक्षाची अशी भूमिका आत्मघाती असल्याचा इशाराही तिवारी यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पैसे खर्च करून किमान दहा वेळेला मुंबईला गेलो. मात्र कधीच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. उलट हाकलून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कधीच संवाद साधला नाही. फक्त एकदा भेटले आणि मला तुमच्याशी शांतपणे भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र शांतपणे भेटण्याची ती वेळ आजवर आली नाही, अशी खंत ही तिवारी यांनी बोलून दाखवली.
राणा दाम्पत्याने ठाकरे कुटुंबावर एवढे हल्ले करत अक्षरशः कचरा केला
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी ठाकरे कुटुंबावर एवढे हल्ले करत अक्षरशः कचरा केला, तरी रवी राणाविरोधात प्रीती बंड सारखा दमदार उमेदवार असताना कमकुवत उमेदवार देऊन चुकीचा उमेदवार देऊन रवी राणाला विजयाचा पॅसेज देण्यात आल्याचा गंभीर आरोप ही तिवारी यांनी केला. लबाड व्यक्ती आणि चाटूकारांची फौज गोळा करून उद्धव ठाकरे जर पक्षाची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न करत असतील आणि आम्ही पक्षाच्या चुका लक्षात आणून देत असताना आम्हाला पदमुक्त केलं जात असेल तर आम्ही काय म्हणावं अशी भावना तिवारी यांनी व्यक्त केली..
किशोर तिवारी यांचे इतर मुद्दे
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याबद्दलही शिवसेनेकडून नाहक नाराची व्यक्त करण्यात आली.
- शिवसेना उबाठाला कुठलाही कार्यक्रम नाही, दिशा नाही, जर पक्ष कुठला तरी कार्यक्रम आणि दिशा घेऊन चालला असता तर आज एवढ्या लोकांनी पक्ष सोडला नसता.
- सनातनच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिव्या दिल्या जातात, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून टीका होत असताना शिवसेना उबाठाने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही.
-शिवसेना उबाठामध्ये समन्वय आणि संवाद नावाची कुठलीही गोष्ट नाही.
-एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर जेव्हा खासदार पक्ष सोडत होते. तेव्हा त्यांच्याशी कोणीही बोलायला तयार नव्हते. मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा अनेकांनी सांगितलं की विनायक राऊत यांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही पक्ष सोडून चाललो आहे.
-पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी संजय राठोड आणि भावना गवळी यांचा बचाव करत असताना मला त्यांचा बचाव करण्यापासून थांबवण्यात आले.
-शिवसेनेकडून निवडणुकात उभे राहिलेल्या उमेदवारांना संघटनेची आणि आर्थिक शक्ती दिली जात नाही अशा स्थितीत शिवसेना उबाठा भाजपसमोर टिकूच शकत नाही.
- रामटेक, बडनेरा यासह अनेक मतदारसंघांमध्ये चुकीचे उमेदवार देण्यात आले.
-लोकसभेच्या थोड्याशा यशानंतर विधानसभेत आमचीच सत्ता येणार असा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. काही तर मीच आमदार होणार, मीच मंत्री होणार इथपर्यंत गेले होते.
-मला पदमुक्त केले आहे, पुढे उद्धव ठाकरे यांनी पक्षमुक्त केलं, तरी ही मी कुठेही जाणार नाही.