पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. करदात्या नागरिकांना सेवासुविधा मुबलक प्रमाणात पुरविल्या नाहीत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी प्रशासन आणि ठेकेदाराशी संगनमत करून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत मागील पाच वर्षातील हा भ्रष्टाचार शहरात गल्लोगल्ली जाऊन नागरिकांपुढे शिवसेनेच्या वतीने मांडण्यात येणार आहे. त्याबाबतचा जनजागृती रथ आज (शुक्रवार) पासून शहरात फिरत आहे. या रथाचे आज उद्घाटन करण्यात आले.
याबाबतची माहिती शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, तुषार सहाने आदी उपस्थित होते.
शहर शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक चित्रफित बनवण्यात आली आहे. ही चित्रफित 10 ते 25 जूनपर्यंत संपूर्ण शहरभर जनजागृती रथावर दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत शहरातील चौकाचौकात प्रसारित करण्यात येणार आहे. या अभियानाचा समारोप 26 जून रोजी शिवसेनेच्या भव्य सभेने करण्यात येणार आहे. या चित्रफिती मध्ये महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचे सांगत भोसले म्हणाले, पिंपरी -चिंचवड मधील नागरिकांना 24 तास मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी अमृत योजना जाहीर केली. या योजनेचे कोट्यवधी रुपयांची कामे महापालिकेने शहर व रस्ते खोदून केली. परंतु, अद्यापही ही अमृत योजना पूर्ण झाली नाही.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी देऊ असे आश्वासन भाजपच्या वतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. पाणीपुरवठ्याची सर्व आश्वासने फोल ठरली आहेत अशी टीका भोसले यांनी केली आहे. तसेच शहराला प्रामुख्याने कचऱ्याची समस्या भेडसावत आहे याविषयी देखील लोकप्रतिनिधींमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. जून महिना उजाडला तरी नाला सफाईचे काम पूर्ण झाले नाही. आता पाऊस सुरू झाला की, नाल्यातील गाळ, कचरा वाहून जाणार आणि नेहमी प्रमाणे प्रशासन ठेकेदाराला पैसे देऊन मोकळे होणार हा दरवर्षीचा प्रकार आहे. नदी पात्रातील जलपर्णी काढण्याबाबत देखील असाच अनुभव आहे.
कोरोना काळात महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून मानवतेला काळीमा फासनारे कृत्य केले आहे. यामध्ये स्पर्श हॉस्पिटल घोटाळ्याबाबत शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. यामध्ये कोरोना झालेल्या एका रुग्णास आयसीयूमध्ये बेड मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपये संबंधित डॉक्टरांनी व मधल्या दलालांनी घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबतही शिवसेनेने भाजपला जाब विचारला होता. कोरोना काळात
शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात देखील भाजपने भ्रष्टाचार केला. कोरोना काळात सर्वत्र उद्योग व्यवसाय ठप्प असताना महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांच्या प्रशिक्षण शिबिराच्या कामात देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाने केला. चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपिठामध्ये घोटाळा, नदी सुधार योजनेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी योजनेतील हजारो कोटींचा घोटाळा असे विविध घोटाळे नागरिकांनी पुढे चित्रफितीद्वारे मांडून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शहरभर घरोघरी जाऊन जन जागृती अभियान राबविणार आहेत. आता महानगरपालिकेतून भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय थांबायचे नाही असा निर्धार सर्व शिवसैनिकांनी केला आहे, असे भोसले म्हणाले.












































