-शिवजयंतीनिमित्त नाना काटे यांचे चिंचवडकरांना आवाहन
चिंचवड, दि. 19 (पीसीबी) – शिवरायांनी स्थापलेल्या महाराष्ट्रात सध्या जातीयवादी राज्यकर्त्यांनी मनामनात द्वेष पेरला आहे. संतांच्या, महापुरुषांच्या विचारधारेतील आणि खुद्द स्वराज्यनिर्माणकर्त्या छत्रपती शिवरायांच्या मनातील रयतेचं राज्य आणण्यासाठी, त्यांच्या संकल्पनेतील लोकशाही आणण्यासाठी जातीयवादी शक्तींचा बिमोड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरातील बोकाळलेला भ्रष्टाचार संपविण्यासाठी भाजपला हद्दपार करा, असे आवाहन चिंचवडचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी नागरिकांना केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नाना काटे यांनी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की , ‘छत्रपती शिवरायांनी आदर्श राज्याची संकल्पना मंडळी आणि यशस्वीही करून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उत्कृष्ट प्रशासनात समाजातील बारा बलुतेदारांना मानाचं स्थान होतं. त्यांनी कधीही जाती-धर्माचा भेदभाव केला नाही. मात्र त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना सर्वच स्तरावरील लोकांना सोबत घेऊन जायचं आहे.’
पुढे नाना काटे म्हणाले की, सध्या भारतीय जनता पक्षाकडून सर्वत्र जातीय द्वेष, भेदभाव, तणाव निर्माण करण्यात येत आहे. अशावेळी नागरिकांनीच सजगतेने पुरोगामी विचारसरणीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वच घटकांना सोबत घेतलेल्या महाविकास आघाडीलाच मतं द्या’, असे आवाहन नाना काटे यांनी केले. शिवरायांच्या विचारधारेवर चालत मतदारसंघातील समस्या त्वरित सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी संत निरंकारी सत्संग भवनालाही भेट दिली. ज्योतिबा नगर रोड, रहाटणी येथील नानांच्या कार्यालय येथे शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, सायली किरण नढे , विनोद नढे, शिवाजी काळे, संतोष कोकणे, विजय सुतार , पोपट नढे, गणेश काळे , संतोष काटे , चेतन काटे, तन्वीर तांबोळी, विशाल दिलीप नढे आदी उपस्थित होते.
* विविध संघटनांचा नाना काटेंना पाठिंबा
आरपीआयचे महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांनी नाना काटे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी राजेंद्र तुळशीराम आठवले (महाराष्ट्र प्रदेश सचिव), कैलाश जोगदंड (महाराष्ट्र संघटक), प्रियदर्शनी निकाळजे (महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष), विकास साळवे, (पुणे जिल्हा अध्यक्ष), अंकुश चव्हाण (पुणे जिल्हा युवक अध्यक्ष), नितीन पटेकर (अध्यक्ष), लताताई कांबळे, चंद्रकांत ओहळ (मावळ तालुका अध्यक्ष) यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचबरोबर अखिल भारतीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनीदेखील नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला. यासंबंधीचे पत्र त्यांनी काटे यांना दिले.