शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो – नरेंद्र मोदी

0
122

ठाणे, दि. ३० – पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी यांनी शिवभक्तांची सूद्धा माफी मागितली. माझे संस्कार वेगळे आहेत असे म्हणत माफी मागत असल्याचे ते म्हणाले. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नसलेल्यांपैकी मी नाही. माझे संस्कार वेगळे आहेत, असेही पीएम मोदी म्हणाले. शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मोदींच्याच हस्ते गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. मात्र, हाच पुतळा कोसळल्याने राज्यात संतप्त असून हा महाराजांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे मोदी राज्यात आल्याने कोणती प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष होते. मात्र, त्यांनी थेट माफीनामा देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत
पीएम मोदी म्हणाले की, मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो.

ते पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही जे लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतो, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. तरीही वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.