शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहणार- सतीश काळे

0
146
  • ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होणार जल्लोषात साजरा

राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी या सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर हा सोहळा साजरा होतो. यंदा शिवभक्तांचा आकडा चार ते पाच लाखांवर जाण्याची शक्यता आहे. देशभरातून इतिहास संशोधक,अभ्यासक,शिवभक्त इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. समितीतर्फे शिवभक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. तसेच रायगडावर ५ व ६ जूनला वैविध्यपूर्ण व कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे.

पहाटे रायगडावरील नगारखान्यासमारे भगवा ध्वज उभारुन राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे. युवराजांच्या हस्ते मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर मुर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. रणवाद्य हलगी, घुमक व कैताळाच्या कडकडाटात होळीच्या माळावर शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या लोकोत्सवात भव्य पालखी सोहळा,छत्रचामरासह शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असेल,पारंपारिक वेमभूषेत शिवभक्त सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांना युवराज संभाजीराजे मार्गदर्शन करतील.

दरम्यान महिला व पुरुषांची ढोल- ताशा पथके पुर्णा येथील रणवाद्य ढोल ताशा पथक व शंभूगर्जना ढोल ताशा पथक तसेच कोल्हापूर येथील नाद ढोल ताशा पथके,ढाल तलवारीची युद्ध कला,जागर शिवशाहीचा स्वराज्याच्या इतिहासाचा व सोहळा पालखीचा,स्वराज्य ऐक्याचा आदींसह विविध कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण बिंदू असणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या व्यवस्थेसाठी पाणी अन्नछत्राची व्यवस्था तसेच पार्किंग आदींची व्यवस्था केली असून यासाठी समितीच्या संकेतस्थळ व सोशल प्लॅटफॉर्मवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.