दि. ३ (पीसीबी)- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. शिल्पा आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, अभिनेत्रीने आता मुंबईतील वांद्रे येथील तिचे रेस्टॉरंट बास्टियन बंद करण्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. शिल्पा शेट्टीने मंगळवारी तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी दिली.
शिल्पा शेट्टीसोबत ‘बैस्टियन’ बँद्राची सह-मालक रेस्टॉरंट व्यावसायिक रंजीत बिंद्रा आहेत. हे रेस्टॉरंट 2016 मध्ये सुरू झाल्यापासून आपल्या सी-फुडसाठी प्रसिद्ध राहिले आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आठवड्यांतच बॅस्टियन बंद करण्याची घोषणा करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील एका व्यावसायिकाची 60.4 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याच्या प्रकरणात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण एका कर्ज व गुंतवणूक कराराशी संबंधित आहे. या घटनेच्या संदर्भात एका अज्ञात व्यक्तीवरही आरोप ठेवण्यात आला आहे.
तक्रारदार दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांची 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली. हे प्रकरण दांपत्याच्या आता बंद पडलेल्या कंपनी ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’शी संबंधित आहे. कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ही रक्कम 2015 ते 2023 दरम्यान व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली गुंतवली होती, परंतु ही रक्कम कथितपणे त्यांच्या खासगी खर्चांसाठी वापरली गेली. सध्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वतीने त्यांच्या वकिल प्रशांत पाटील यांनी हे आरोप फेटाळले असून सांगितले की, या प्रकरणी 4 ऑक्टोबर 2024 रोजी NCLT मुंबईने आधीच निर्णय दिला आहे. त्यांनी सांगितले, “हे एक जुने व्यवहार आहे, ज्यात कंपनी आर्थिक अडचणीत आली होती आणि त्यामुळे एका दीर्घ कायदेशीर लढाईत अडकली, जी NCLTमध्ये चालली. यात कोणतीही गुन्हेगारी बाब नाही. आमच्याकडून वेळोवेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या मागणीनुसार कॅश फ्लो विवरण सादर करण्यात आले आहे.”














































