मालवण, दि. ३० (पीसीबी) : सिंधुदुर्ग येथील मालवण येथे राजकोटावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हा पुतळा उभरणारा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट असलेला चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट ही चेतन पाटील याने केले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चेतन पाटील याने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहे. पूर्ण पुतळ्याचे नाही तर फक्त पुतळ्याचे ऑडिट केल्याचं त्यानं म्हटलं आहे. दरम्यान, काल कोल्हापूर पोलिस चेतन पाटीलच्या शिवाजी पेठ येथील घरी गेले होते. यावेळी त्याची चौकशी देखील करण्यात आली होती. दरम्यान, मध्यरात्री ३ च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केली आहे. चेतन पाटीलची कसून चौकशी केली जाणार आहे. यात काही वेगळी माहिती मिळते का याचा शोध पोलिस घेणार आहेत.
चेतन पाटील हा या पुटल्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारण्यात आले, त्याची रचना त्याने नौदलाला तयार करुन दिले होते. त्याव्यतीरिक्त त्याला नौदलाकडून कोणतेही वर्क ऑर्डर मिळाले नाही असे चेतन पाटीलने म्हटलं आहे. त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम ठाण्यातील कंपनीनं केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे याचा शोध पोलिस घेत आहेत.