शिरूर लोकसभेसाठी पूर्वा वळसेंचे नाव चर्चेत, अजितदादा तीन दिवसांचा दौरा करणार

0
295

पुणे, दि. २ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेची जागा जिंकण्याचा संकल्प सोडणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तीन ते पाच मार्च असा तीन दिवसांचा हा दौरा असून, यामध्ये लोकसभेच्या उमेदवाराच्या नावावर अंतिम चर्चा होऊन शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सात वेळा आमदार आणि सलग २५ वर्षे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा हिचे नाव आता उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे.

आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि शिरूर या दोन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जाहीर केले आहे. त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवातदेखील केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे हेच आमचे उमेदवार असतील, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिरूरमध्ये उमेदवार उभा करून विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार केला आहे. डॉ. कोल्हे Amol Kolhe यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी सुरू आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, यांच्यासह माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, यासाठी अजितदादा विशेष आग्रही आहेत. मात्र, वळसे पाटील यासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सध्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार तीन दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर तसेच भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत तेथे सभा घेणार आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची चर्चा केली जाणार आहे. तीन दिवसांमध्ये हा दौरा पूर्ण करत त्या भागातील पक्षाच्या प्रमुखांची चर्चा करून उमेदवार निश्चितीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दौऱ्यामधून अजितदादांना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेना पक्षाच्या मदतीने लढविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच अजित पवार यांनी जाहीर केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील बारामती लोकसभा मतदार loksabha Constituency संघाप्रमाणेच ‘अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार’ अशीच लढत होणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या मतदारसंघातून तरुणांना संधी म्हणून आयत्यावेळेस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे नाव आयत्यावेळेस पुढे येऊ शकते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बहुतांश सर्वच विधानसभांचे आमदार हे तरुण असल्याने खासदारकीसाठी नवीन आणि तरुण चेहरा म्हणून पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.