पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी मतदार संघाचा दौरा केला आणि आढावा घेतला. त्यामुळे भाजपने शिरूर मतदारसंघावर चांगलेच लक्ष्य दिले असल्याचे दिसते.
पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने लोकसभा कोअर कमिटी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी तथा आमदार माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, समन्वयक धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषदेतील माजी गटनेता शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.
यावेळी बूथ सक्षमीकरण, शक्ती केंद्र नियोजन आणि संघटनात्मक बांधणीबाबत आढावा घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी दौरा केला आहे.