शिरदे शाळेत बाल आनंद मेळाव्यातून उपयोजनात्मक शिक्षणाचे धडे

0
23

दि . २६ ( पीसीबी ) – मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा शिरदे गावामध्ये स्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरदे येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यामध्ये विविध गुणदर्शन, बालजत्रा तसेच मुले व माता पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले. खाऊ गल्लीच्या माध्यमातून विविध खाऊ जसे चॉकलेट, बिस्किटे, वडापाव, समोसे, पाणीपुरी, सॅलड, विविध प्रकारचे फळे, स्थानिक पातळीवर उपलब्ध भाज्या यांचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी स्वतः मांडले व त्यांची विक्री केली. या माध्यमातून गणितातील विविध संबोध, मापन, रुपये–पैसे संकल्पना तसेच खरेदी विक्रीच्या माध्यमातून होणारा नफा तोटा मुलांना स्वतःच्या अनुभवातून शिकता आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमेधा काळे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवातून व्यावहारिक ज्ञान अधिक सकारात्मक पद्धतीने आत्मसात करता येते. मुलांनी शाळेच्या वर्गखोलीत मिळवलेले गणितीय संबोध मापन पद्धती तसेच संवाद कौशल्याचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनात होणे अपेक्षित आहे. हेच या बाल आनंद मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट असून त्या दृष्टीने शाळा प्रयत्नशील आहे.”
या बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच सुशिलाताई बगाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पल्लवी बगाड, अंगणवाडी सेविका बेबीताई लांघी, शिल्पाताई बगाड, अलकाताई कोकाटे संतोष बगाड, ठकीबाई बगाड ,रूपाली ताते,भाऊ वाजे, सर्व ग्रामस्थ, उपस्थित होते.
शाळेत असे अनेकविध उपक्रम आयोजित केले जातात. या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमेधा काळे व शाळा व्यवस्थापन समिती, शिरदे यांनी केले.