शिरगाव, सांगवी, मोशी मध्ये तीन अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

0
164

शिरगाव, सांगवी आणि मोशी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव ते कासारसाई रस्त्यावर रविवारी (दि. 5) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याने पायी जात असलेल्या एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हिराबाई साहेबराव मोरे (वय 70, रा. दारूंबरे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कन्हैया मारुती सोरटे (वय 30) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची माहिती न देता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वराज गार्डन चौकात रविवारी रात्री साडे अकरा वाजता अपघात झाला. या अपघातात अभयसिंह दत्तात्रय शेडगे (वय 41, रा. पिंपळे सौदागर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेडगे हे त्यांच्या कार मधून जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात कारचे नुकसान झाले. तसेच शेडगे जखमी झाले. कार चालक अमीर जाफर मुलानी (वय 21, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे देहू-आळंदी रस्त्यावर झालेल्या अपघातात ऋषिकेश शशिकांत सोनावणे (वय 22, रा. घरकुल, चिखली) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विनायकदादा भाऊ घेनंद (रा. वडगाव घेनंद, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विनायक याने त्याच्या ताब्यातील कार बेदरकरपणे चालवून सोनावणे यांना धडक दिली. त्यात सोनावणे जखमी झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.