शिक्षकाने केला नववीतील विद्यार्थीनीवर अत्याचार; पुण्यातील दौंड तालुक्यातील घटना

0
115

पिंपरी, दि. २२ ऑगस्ट (पीसीबी) पुणे : राज्यामध्ये दिवसेंदिवस मुली आणि महिलांच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बदलापूर येथील दोन चिमुकलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला असून एकच खळबळ उडाली आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून हा प्रकार केल्याचे समोर येत आहे.

बापूसाहेब धुमाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो दौंड तालुक्यातील मळद इथल्या भैरवनाथ विद्यालयामध्ये शिक्षक आहे. या संदर्भात पालकांना माहिती मिळाल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासन व पोलीस प्रशासनाला याबाबत जा विचारला आहे. पोलिसांनी या शिक्षकाचा मोबाईल ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. पीडित विद्यार्थिनी ही नववी इयत्तेमध्ये शिकत असल्याची माहिती समोर येत आहे

भैरवनाथ विद्यालयामध्ये बापू धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करतो. व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार करीत असे. एका पीडित मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली आहे.

या घटनेनंतर मळद गावातील ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्गुरू सेवा शिक्षण संस्था संचलित श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मळद(नवीन माध्यमिक विद्यालय) हे विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे असून संस्थाचालक बबन रणवरे हे आहेत. या घटनेमुळे दौंड तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी शिक्षकाने आणखी विद्यार्थिनींचे देखील लैंगिक शोषण केले असल्याची माहिती आता समोर येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आपली बाजू मांडण्यासाठी समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.