“शिक्षकाच्या एका शब्दाने जीवनाला कलाटणी!”

0
277

पिंपरी, दि. ३१(पीसीबी) “सामान्य बौद्धिक कुवत असलेल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला शिक्षकाच्या एका प्रेरणादायी शब्दाने कलाटणी मिळू शकते!” असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय पातळीवरच्या ‘दैनिक इन्कलाब’ या नियतकालिकाचे संपादक शाहिद लतिफ यांनी बीना एज्युकेशनल सोसायटी, पांढारकरनगर, आकुर्डी येथे शनिवार, दिनांक ३० जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. बीना एज्युकेशनल सोसायटीच्या मुख्तारुन्निसा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स तसेच नूर ॲकेडमी फॉर पॅरामेडिकल या संस्थांचे उद्घाटन शाहिद लतिफ यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जागृती धर्माधिकारी, बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष इक्बाल खान, सचिव आझमखान, संचालक हामझा खान, अकमल खान, मौलाना अबुल गफ्फार, मौलाना सैफी, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, मुफ्ती अब्दुल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या समिना मोमीन यांनी प्रास्ताविकातून बीना एज्युकेशनल सोसायटीची प्रगती आणि भावी काळातील उद्दिष्टे याबाबत माहिती दिली. इक्बाल खान यांनी आपल्या मनोगतातून, “त्रेसष्ठ विद्यार्थ्यांपासून बीना इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात केली. आता बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय आणि आरोग्यविषयक शिक्षणसंस्थेचा प्रारंभ हा एक टप्पा आहे. सर्वांचे सहकार्य अन् आशीर्वाद यांच्या बळावर या शैक्षणिक संकुलाचे बीना विद्यापीठात रूपांतर व्हावे हेच ध्येय आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. जागृती धर्माधिकारी यांनी, “एक आदिवासी महिला देशाची प्रथम नागरिक होते, ही खूप दिलासादायक बाब आहे. मुलींनी उच्चशिक्षित होऊन सक्षम होणे, हेच त्यांच्या स्वावलंबनाचे अन् संरक्षणाचे साधन आहे!” असे मत मांडले. अब्दुल सलाम इनामदार, गुलाम मोहम्मद शेख यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘फ्लाईट’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

उपस्थित संचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना संबोधित करताना शाहिद लतिफ पुढे म्हणाले की, “एका सर्वसाधारण वस्तीत उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, ही खरोखरच स्तुत्य बाब आहे. केवळ सिमेंट, वाळू, विटा यांनी इमारत पूर्णत्वास जात नाही; कारण त्यामध्ये मानवी आधिवास असल्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी, अध्यापक, पालक, संचालक यांच्या सहयोगातूनच गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संकुल उभे राहते. नैराश्याने ग्रासलेल्या लेझ ब्राऊन या विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाच्या एका प्रेरणादायी शब्दाने एवढी क्रांती घडवून आणली की, तो आज अमेरिकेतील सर्वात प्रभावी वक्ता आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणे आणि आपला पाल्य शाळेत शिकून सक्षम होत आहे की नाही हे तपासून पाहणे, असे शिक्षक आणि पालक यांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे!” कार्यक्रमापूर्वी, बीना शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या समाजोपयोगी उपकरणांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली. बीना एज्युकेशनल सोसायटीचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. शाहिन वाधवा यांनी सूत्रसंचालन केले. हेरा खान यांनी आभार मानले.