“शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे!” – शेखर गायकवाड

0
164

पिंपरी,दि. ६ (पीसीबी) “जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी हे कौशल्यांच्या बाबतीत मागे आहेत. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे!” असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रतिभा महाविद्यालय, जुना मुंबई-पुणे महामार्ग, काळभोरनगर, आकुर्डी येथे सोमवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ रोजी केले. कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्, लायन्स क्लब ऑफ पीसीएमसी ॲण्ड मावळ, व्हीईएस जैन इंग्लिश स्कूल आणि श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर या संस्थांनी आयोजित केलेल्या शिक्षकदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शेखर गायकवाड बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य राजेश पांडे, कमला एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, लायन्स क्लब ३२३४ डी-२ प्रांतपाल डॉ. परमानंद शर्मा, उपप्रांतपाल सुनील चेकर, जैन इंग्लिश स्कूल विश्वस्त प्रकाश ओसवाल, कार्यक्रमाचे समन्वयक लायन दामाजी आसबे, अनिल झोपे, शशी कदम, प्रशांत कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कांकरिया, भूपाली शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेश पांडे यांनी आपल्या मनोगतातून, “भावी काळात शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून वैद्यकीय अन् अभियांत्रिकी यांसारख्या शाखांचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हे गुरुजनांचे आद्यकर्तव्य आहे!” असे विचार मांडले. लायन्स इंटरनॅशनलच्या सव्वीस क्लब्सनी एकत्रित येऊन शिक्षक अभिवादन सोहळा आयोजित केला असल्याची माहिती समन्वयक लायन दामाजी आसबे यांनी दिली.

डॉ. दीपक शहा यांनी, “भारतीय संस्कृतीत आईवडिलांनंतर गुरुजनांचे स्थान महत्त्वाचे असून ते भावी नागरिक घडविण्याचे काम करतात!” असे विचार व्यक्त केले. डॉ. परमानंद शर्मा यांनी एक शिक्षक – एक विद्यार्थी ही अभिनव संकल्पना मांडून ती यशस्वीपणे राबविणाऱ्या पाच भाग्यवान शिक्षकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा सन्माननिधी प्रदान करण्यात येईल असे जाहीर केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुमारे सत्तर शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सुनील चेकर यांनी ‘मानवंदना’ या शिक्षकांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या दरम्यान ‘बॉईज-३’ या आगामी चित्रपटाच्या टीमने उपस्थित राहून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शेखर गायकवाड पुढे म्हणाले की, “यावर्षी जागतिक पातळीवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची संख्या समान आहे. आता येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करता येईल. ज्ञानाची व्याप्ती वेगाने वाढत असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त परमेश्वर जागृत करण्यासाठी योगदान द्यावे!” लायन प्रशांत शहा, नीलेश मेटे, अमृतराव काळोखे, अशोक लेंभे, वसंत गुजर, पवन कर्मा, प्रकाश मुटके, डॉ. सचिन बोरगावे, प्रमोद जाधव, प्रदीप कुलकर्णी, प्रमिला वाळुंज, डॉ. पुर्णिमा कदम, सरस सिन्हा, वनिता कुऱ्हाडे, सविता ट्राविस, अजित देशपांडे यांनी संयोजनात सहकार्य केले. सुवर्णा गोगटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. क्षितिजा गांधी यांनी आभार मानले.