शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक

0
69

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी आधी आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करावी लागेल. यातील महत्वाचा दुवा शिक्षक असून त्यासाठी शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पाय जॅम फाऊंडेशनसोबत मिळून २१ व्या शतकातील आधुनिक कौशल्ये महापालिका शाळेतील शिक्षकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातंर्गत शिक्षकांना मुलभूत संगणक व कोडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील ४४ मॉडेल शिक्षक महापालिका शाळेतील इतर शिक्षकांना संगणक तसेच कोडिंगचे प्रशिक्षण देतील ज्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविण्यासाठी सक्षम होतील, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाय जॅम फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील शैक्षणिक वर्षात मुलभूत संगणक व कोडिंग प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ४४ शिक्षकांची मॉडेल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. या मॉडेल शिक्षकांचा प्रमाणपत्र वाटप तसेच सन्मान समारंभ पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पाय जॅम फाऊंडेशनचे संस्थापक शोएब दास, कॅपजेमिनी उद्योग समुहाच्या सीएसआर व्यवस्थापक धनश्री पांगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रझिया खान, उपशिक्षणाधिकारी बुधा नाडेकर तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि महापालिका शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

मुलभूत संगणक व कोडिंग प्रशिक्षणामध्ये मुख्यत्वे ५ मॉड्युलचा समावेश होता. या प्रशिक्षणात एकूण २०० शिक्षक सहभागी झाले होते पण त्यातील १३५ शिक्षक प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहेत. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिक्षकांसमोर संपुर्ण मोड्युल पुर्ण करणे, विद्यार्थ्यांसोबत तास घेणे, विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, पाठ्यक्रमातील घटकांवर ऍनिमेशन बनविणे हे निकष ठेवण्यात आले होते. महापालिका शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या डिजीटल साहित्याचा उपयोग मुलांच्या सर्जनशिलता, आधुनिक कौशल्ये यासाठी होणे गरजेचे आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्येक महापालिका शाळेतील किमान २ शिक्षक संगणक व २१ व्या शतकातील कौशल्यांनी समृद्ध असावेत असे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा मूलभूत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्यातील १० शिक्षकांची नेमणूक मास्टर ट्रेनर म्हणून केली जाणार असून हे मास्टर ट्रेनर्स शाळेतील शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील आधुनिक कौशल्ये निरंतर रूजत राहतील यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमात महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मॉडेल शिक्षकांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जयश्री राऊत, शुभांगी वाजे, सुनिता पांढरकर, आदिनाथ कराड, संगीता कहाणे, प्रियांका सानप, सुनीता तिकोणे, रेश्मा पटेल, अलका पाटील, माधुरी शितोळे, मनीषा भिसे, मंजुषा अहिनवार, वर्षा सावंत, मुक्ता आसवले, नामदेव चव्हाण, दिपाली पाटील, उज्वला जाधव, संगिता शिंगोटे, अनिता शिंगाडे, निकीता कांबळे, करूणा परबत, मंगल शेळकांडे, क्षितीज शिंदे, मनीषा दरेकर, रंगनाथ गुंजाळ, मंदा पारधी, अंकुश लांडे, रंजना शिंदे, अर्चना भोईर, अश्विनी घुगे, संगीता कराड, मनीषा शिंदे, सविता गावडे, शबाना शेख, मंजुषा लोखंडे, अर्चना माने, निलम वर्पे, संपदा काळे, वीणा दाभाडे, गीतांजली गाडेकर, विद्या पवार, अर्चना पाटील, ममता चंदनकर, सोनाली कुडले या शिक्षकांचा समावेश होता.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘ड्रेनेज अलर्ट सिस्टीम’ या प्रकल्पाला कुलेस्ट प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोडींग विथ कमिटमेंट या प्रकारात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या श्रावस्ती गायकवाड, नैतिक इहारे, निकीता वाघचौरे, निकीता थिटे या विद्यार्थ्यांचा सन्मान आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी मानले.