भिगवण, दि.२५ (पीसीबी) : बारामतीतील विमानतळावरून उड्डाण झालेले शिकाऊ विमान कडबनवाडी (ता. इंदापूर) जवळ कोसळल्याची घटना आज सोमवारी (ता.२५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुदैवाने या विमानातील महिला पायलट सुरक्षित आहे. तर विमानाचे पूर्ण नुकसान झाले आहे.या अपघातात भाविका राहुल राठोड (वय-२२ रा. पुणे) असे जखमी झालेल्या महिला शिकाऊ पायलटचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलटांना प्रशिक्षण दिले जाते. बारामतीतील विमानतळावरून सोमवारी (ता.२५) सकाळी उड्डाण झाले होते. हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मदतीने विमानातील महिला पायलट भाविकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
या अपघातात भाविक राठोड या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. तर या अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. मात्र विमान कशामुळे पडले. याबाबत अद्यापही कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही.