मुंबई, दि. ९ (पीसीबी) : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी भाजप आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदिपन भुमरे, संजय राठोड, शंभुराजे देसाई, दिपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, आजच्या शपथविधीवेळी तीनच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदा शपथ घेतली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र यामागे पक्ष महत्वाचा नसून विखे पाटील यांची जेष्ठता हे सर्वात मोठे कारण सांगितले जात आहे. गतवर्षी केंद्रात मोदी सरकारचा विस्तार झाला होता त्यावेळी देखील नारायण राणे यांनी पहिल्यांदा शपथ घेतली होती. त्यावेळीही आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. मात्र माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जेष्ठता मोठी असल्याने त्यांचाही नंबर पहिला होता.
१९९५ साली तत्कालीन आमदार अण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटील यांच्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघ उपलब्ध करून दिला आणि ते पहिल्यांदा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्यानंतर दोन वर्षांमध्ये त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसलाही रामराम केला. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि १९९७ च्या पोटनिवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार आणि पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ असे सातत्याने ते विधानसभेवर निवडून येत आहेत. आजवरच्या एकूण राजकीय कारकिर्दीमध्ये विखे पाटील यांनी तब्बल सातवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास :
सातवेळा आमदार : मार्च १९९५ – पहिल्यांदाच काँग्रेसकडून विधानसभा सदस्य. मे १९९७ – विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आणि शिवसेनेत प्रवेश. सप्टेंबर १९९७ – दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यपदी निवड. जुलै १९९९ – तिसऱ्यावेळी शिवसेनेकडून विधानसभा सदस्यपदी निवड. ऑक्टोबर २००४ – चौथ्यावेळी काँग्रेसकडून विधानसभा सदस्यपदी निवड. ऑक्टोबर २००९ – पाचव्या वेळी काँग्रेसकडून विधानसभा सदस्यपदी निवड. ऑक्टोबर २०१४ – सहाव्या वेळी काँग्रेसकडून विधानसभा सदस्यपदी निवड. जून २०१९ – विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आणि भाजपमध्ये प्रवेश. ऑक्टोबर २०१९ – सातव्या वेळी विधानसभा सदस्यपदी निवड
सातवेळा मंत्री :
मे – १९९७ ते फेब्रुवारी १९९८ – मनोहर जोशी सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री (कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय)
फेब्रुवारी १९९८ ते ऑक्टोबर १९९९ – नारायण राणे सरकारमध्ये दुसऱ्या वेळी मंत्री (कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय)
फेब्रुवारी २००९ – अशोक चव्हाण सरकारमध्ये तिसऱ्या वेळी मंत्री (शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री, औरंगाबाद जिल्हा)
नोव्हेंबर २००९ – अशोक चव्हाण सरकारमध्ये चौथ्यावेळी मंत्री (परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय)
नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ – पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये पाचव्या वेळी मंत्री (कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती)
नोव्हेंबर २०१४ – काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड
डिसेंबर २०१४ ते जून २०१९- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते
जून २०१९- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहाव्या वेळी (गृहनिर्माण)
ऑगस्ट २०२२ – एकनाथ शिंदे सरकारमध्ये सातव्या वेळी मंत्री