शिंदे सरकारची अजून हळदह उतरली नाही, मग वेदांत-फोक्सकॉनला ते दोषी कसे ?

0
267

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात होणार होता, पण तो गुजरातला हलविण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. विरोधकांनी ‘वेदांता’ वरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. भाजप सरकार राज्यातील प्रकल्प फायद्यासाठी गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जात आहे, याला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“शिंदे भाजप सरकार काल आले आहे, अजून शिंदे – फडणवीस सरकारची हळद देखील उतरली नाही. एखादा प्रोजेक्ट जर राज्यातून बाहेर गेला असेल, तर त्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार कसे कारणीभूत असू शकेल,” अशा शब्दात रामदास कदम यांनी विरोधकांना फटकारले आहे.

रामदास कदम म्हणाले, “प्रकल्प बाहेर जाणे हे सर्व महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, इतका मोठा रोजगार देणारा प्रोजेक्ट बाहेर जातो कसा? या बाबतची अधिकची माहिती घेणे गरजेचे आहे, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करेल”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत सखोल चौकशी करावी, आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. आपण कुठे कमी पडलो, पुन्हा हा प्रकल्प आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून आणू शकतो का? या विषयावरही आपण चर्चा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

“वेदांत-फॉक्सकॉन हा प्रकल्प जाणे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी मोठा धक्का असेल. महाराष्ट्राला या बदलामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावा,” अशी मागणी करत राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.