शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान

0
215

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच… लवकरच… म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी शिंदे-फडणवीस गटातील काही महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळाच्या फायनल यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नव्हतं. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. या 18 जणांमध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नाही.

अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारा मुहुर्त गवसला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. त्यासाठी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ठाकरे गटात मंत्री असणाऱ्या अनेक आमदारांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या आमदार यामीनी जाधव, लता सोनवणे यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, भाजपच्या गोटातून मंदा म्हात्रेंची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, मंत्रिपदी वर्णी लागणाऱ्या फायनल आमदारांच्या यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.