‘शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे चाकर म्हणून चोरली मराठी तरुणांची भाकर’, राष्ट्रवादीचे भोसरीत आंदोलन

0
263

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – “शिंदे-फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी पण करतात गुजरातची चाकरी”, “घेऊन पन्नास खोके, महाराष्ट्रातील युवकांना देतात धोके”, “गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा”, “शिंदे- फडणवीस गुजरातचे चाकर म्हणून चोरली मराठी तरुणांची भाकर”, “गुजरात उपाशी महाराष्ट्र उपाशी”, ” आमच्या रोजगाराची हमी द्या, बंद करा गुजरातची गुलामी” अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी) राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्याचा निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे आंदोलन केले. महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर ,संजय वाबळे, प्रसाद शेट्टी,माया बारणे,मारुती भापकर,संगीता ताम्हणे,ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे,काशीनाथ नखाते, काशिनाथ जगताप,ज्योती गोफणे,अकबर मुल्ला,उज्वला ढोरे, युवक कार्याध्यक्ष निलेश निकाळजे,प्रवीण खरात, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, युवक उपाध्यक्ष रोहित वाबळे, अमोल रावळकर, तुषार ताम्हणे, लवकुश यादव,मंगेश बजबळकर, शारुख शेख, सरचिटणीस दीपक गुप्ता, संकेत जगताप, सागर वाघमारे,मयूर थोरवे,अनुज देशमुख,रोहित खोत शहरसचिव ओम शिरसागर सतेज परब, साहिल शिंदे, मयूर खरात, निखिल गाडगे, गफूर शाह,इखलास भाई सैय्यद,रोहित मोरे आणि मोठ्या संख्येत युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष शेख म्हणाले “प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी-चिंचवड मधील युवकाकडून हिरावून घेत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची भाकरी खातात परंतु गुजरातची चाकरी करतात असा आरोप त्यांनी या वेळेस केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड मधील अनेक उद्योग धंदे गुजरात मध्ये हलवले, तसेच तीन दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा महाराष्ट्राचे 40 हजार कोटी केंद्र सरकारला परत पाठवले.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, एन एस जी,मरीन पोलीस अकॅडमी, केंद्रीय यंत्रणाचे कार्यालय, आंतरराष्ट्रीय हिरे मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुंबईचे मुख्यालय अजून अनेक उद्योगधंदे व महत्त्वाचे कार्यालय देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्या महाराष्ट्र विरोधी धोरणामुळे गुजरातला गेल्याचे आरोप यावेळेस शेख यांनी केले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब यानंतर विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हे पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून उदयास आले. पूर्ण भारतातून लोक पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात येत असतात. आयटी,मोठ मोठे उद्योग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराला या देशातील नागरिकांना उपलब्ध करून दिले. कधीही कोणाशी भेदभाव केला नाही. परंतु, हे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या दीड लाख युवकाचा रोजगाराच्या संधी गुजरातच्या घशात घालण्याचे जे काम करत आहे. यावरून स्पष्ट होत आहे की हे सरकार गुजरात धार्जिणा असून महाराष्ट्राच्या युवकांशी यांचं काहीही घेणे देणे नाही. म्हणून वेदांत सारखा प्रकल्प व्यवसायासाठी पूरक असा वातावरण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात चांगलं असून देखील महाराष्ट्रात आला असताना देखील गुजरातला पळवण्याचा पाप या सरकारने केले आहे”.