शिंदे गट शिवसेनेत कसलाही भूकंप होणार नाही

0
184

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार हे मनकवडे आहेत का, असा सवाल उपस्थित करुन शिंदे गटाच्या नव्हे राष्ट्रवादीच्या आमदारांत अस्वस्थता आहे, त्याची चिंता रोहित पवारांनी करावी. शिंदे गट शिवसेनेत कसलाही भूकंप होणार नाही. झालाच तर महाविकास आघाडीत भूकंप होईल. त्यातून रोहित पवारांना सावरणे अवघड होईल, असा टोला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लगावला.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आज सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले.भूराज देसाई म्हणाले, आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार मनकवड आहेत काय. त्यांनी आमच्या शिंदे गटाच्या ५० आमदारांची चिंता करु नये. उलट तुमच्या आमदारांत अस्वस्थता आहे, त्याची चिंता पहिल्यांदा करा.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री १८ तास करत आहेत. मागील मुख्यमंत्र्यांशी तुलना केली तर फरक स्पष्ट दिसेल. हे दोघे कोणत्याही आमदारांच्या फाईली अडवत नाहीत. नियमात असलेल्या, जनहिताच्या, लोकहिताच्या फाईलना कधीही विलंब करत नाहीत. त्यामुळे पेंडन्सी रहात नाही. जनहिताची कामे सध्या मोठ्याप्रमाणात चालली आहेत. मागील अडीच वर्षात लोकांची कामे झाली नव्हती, ती आता होत आहेत. हे न बघवल्यामुळे रोहित पवार असे बोलत आहेत. त्यामुळे आमच्या शिंदे, फडणवीस सरकारमध्ये कसलाही भूकंप होणार नाही.

झालाच तर महाविकास आघाडीत भूकंप होईल, त्यातून रोहित पवार यांना सावरणेही अवघड होईल, असा सल्लाही शंभूराज देसाई यांनी दिला.