शिंदे गटाला केंद्राकडून मोठी `गिफ्ट`, दोन मंत्रीपदं, दोन राज्यपाल मिळणार ?

0
343

– गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे यांची नावे चर्चेत

मुंबई,दि. १६ (पीसीबी) : एकनाथ शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी एका मराठी वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार फक्त दोन मंत्रिपदेच नाही, तर दोन राज्यपाल पदांची मागणीदेखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मागणी केल्याचं सूत्रांनी म्हटलंय. दरम्यान, या पदांसाठी जेष्ठ खासदार म्हणून खासदार गजानन किर्तीकर, खासदार प्रताप जाधव तसेच पार्थ पवार यांचा पराभव करणारे श्रीरंग बारणे, मुंबईतील खासदार राहुल शेवाळे आणि मुख्यमंत्री एकनआथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे अशी नावे चर्चेत आहेत.

विशेष म्हणजे अमित शाह मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागणीवर आजच अंतिम निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं जातंय. याशिवाय नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जातेय.

यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, की अमित शाह आणि नरेंद्र मोदी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आता ता भक्कम पाठिंबा 2 केंद्रीय मंत्रिपदासह 2 राज्यपाल पद देण्याइतका मजबूत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. या दोघांच्या नावाची गेल्या दोन दिवसांपासून चर्चाही बघायला मिळाली होती. मात्र या दोघांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताना आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हटलं होतं. आधी ठाकरे गटात असलेल्या गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानं चर्चांनाही उधाण आलेलं. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या इच्छेपोटीच कीर्तिकर शिंदे गटात गेले नाहीत ना?, असा सवालही उपस्थित केला जात होता.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केल्याने मोदी-शाह यांच्या नजरेत बारणे यांचेही नाव आहे. मावळ लोकसभेसाठी २०२४ मध्ये भाजपतर्फे बारणे हे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना सोडण्यापूर्वी शाह यांनी बारणे यांना सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे बारणे यांच्या बरोबर अत्यंत घनिष्ट संबंध असल्याने अजित पवार यांची मक्तेदारी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात भाजपला ताकद मिळावी म्हणून खासदार बारणे यांच्या नावाचा विचार होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमित शाह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकही पार पडली होती. आता समोर आलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील चर्चेवरुनही तर्क वितर्क लढवले जात आहेत.