शिंदे गटाच्या सरपंचानेच दिली हत्येची सुपारी; जमिनीच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला, तिघे जेरबंद, सरपंच फरार

0
53

दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) अलिबाग : जमिनीच्या वादातून अनिल हरिश्चंद्र देशमुख आणि रोहित मोहिते यांच्यावर २५ जून रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी जुन महिन्यात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पोलीसांनी आरोपींची चौकशी केली असता पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख यांनी पैशाचे आणि नोकरी देण्याचे अमिष दाखवून हा गुन्हा अंगावर घेण्यास सांगितल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी ताब्यात घेतलेले आरोपी डमी असल्याचे समोर आले आहे. तर आरोपी सरपंचासह पाचजण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसदरीयेथील अनिल हरिश्चंद्र देशमुख आणि रोहित मोहिते हे २५ जून रोजी कारने नांगुर्लेहून भिलवडेला जात होते. त्यावेळी कारमधून पाचजण आले आणि त्यांना माहिती विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर त्यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यामध्ये जयेंद्र गजानन देशमुख, प्रशांत सूर्यकांत देशमुख, गजानन बाळाराम देशमुख, योगेश वसंत देशमुख, विवेक विश्वनाथ देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख (सर्व रा. म्हारळगाव, ता. कल्याण, जि.ठाणे) यांची संशयित म्हणून नावे दिली होते. तसेच पाच अनोळखी व्यक्तींचा देखील उल्लेख करण्यात आला होता.दरम्यान, कर्जत पोलिसांनी योगेश वसंत देशमुख याला घटना घडली त्याच दिवशी अटक केली. मात्र, अनोळखी आरोपींची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे हा गुन्हा गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करत या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला करण्याचे आदेश दिले.त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक तयार केले. त्यानंतर गोपनीय माहिती तसेच सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे गुन्ह्यातील ५ अनोळखी आरोपींचा शोध घेतला असता ते कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शुभम राजेंद्र कांगणे (वय-२६, म्हारळगाव, कल्याण), नंदेश मिलिंद खताते (वय-२२, म्हारळगाव, कल्याण) यांना २ ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यावेळी पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख यांच्या सांगण्यावरून आम्ही हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यासाठी राजेश सिंग, नितेश सिंग आणि बंटी कांबळे (सर्व रा. म्हारळगाव, कल्याण) यांची मदत घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याच मध्यरात्री पोलिसांनी शुभम कांगणे आणि नंदेश खताते यांना अटक केली. दरम्यान, सरपंच जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख, राजेश सिंग, नितेश सिंग आणि बंटी कांबळे हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.