अमरावती, दि २६ (पीसीबी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते.यावेळी संतोष बांगर यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणादेखील दिल्या. बांगर यांच्या गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बांगर यांनी त्यांना सर्वात शेवटी पाठिंबा दिला होता. बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहेत. ते अमरावती जिल्ह्याच्या दाै-यावर आले होते. या दरम्यान ते अंजनगाव सुर्जीमध्ये आले असता पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक बांगर यांच्या गाडीच्या समोर येत गाडी थांबवायला लागली. आणि बांगर बसलेल्या दरवाजाच्या काचेवर मारायला सुरुवात केली. याचवेळी इतर शिवसैनिक बांगरांच्या गाडीजवळ जमले. बांगर बसलेल्या ठिकाणी गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी हात मारले. अखेर शिवसैनिकांच्या रोष पाहत चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत गाडी न थांबवल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. यावर बांगर यांनी आपल्यासोबत गाडीत पत्नी आणि बहीण असल्याने त्यांनी गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर हल्ला करणाऱ्यांना खोदून-खोदून मारलं असतं, त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी धमक असेल तर हल्ला करावा असे आव्हान शिवसैनिकांना दिले आहे.
शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंसाठी भरसभेत त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले होते. मात्र, शिंदे गट महाराष्ट्रात येताच सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे गटात गेले होते.त्यामुळे त्यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये रोष आहे, त्यातूनच हा हल्ला करण्यात आला.












































