सोलापूर,दि . १८ . पीसीबी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले शिवाजी सावंत, जे आमदार तानाजी सावंत यांचे सख्खे बंधू आहेत, ते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिवाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच गटबाजीला कंटाळून शिवाजी सावंत यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला या प्रवेशामुळे अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर उपरोधिक टीका केली. ‘दिल्या घरी सुखी राहा’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. हा निर्णय वैयक्तिक असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. आमदार तानाजी सावंत यांचे बंधूच भाजपमध्ये गेल्याने हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सोलापूरमध्ये नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.