शिंदे गटाची मोठी फजिती, सराईत अट्टल गुन्हेगाराला प्रवेश देत नंतर केला पश्चाताप

0
272

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : खुनाच्या प्रयत्नासारखे दीड डझनहुन अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे याचा काही दिवसांपुर्वी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश झाला होता. खुद्द खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थानी १८ मार्च २०२३ रोजी त्याचा सभारंभपुर्वक प्रवेश झाला. पण त्याच्याबाबतची वस्तुस्थिती समजताच हा प्रवेश व त्याला दोन दिवसांपूर्वी दिलेले पद स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली.

काळेवाडी,पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत दिघेचा हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. त्याची पत्नी खुशबू आणि या दोघांच्या अडीचशे समर्थकांनीही त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यांचे खा.बारणे यांनी स्वत: शिवबंधन बांधून स्वागत केले. त्यावेळी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खूशबू ही चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी उपाध्यक्षा असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, हा दावा राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी लगेच खोडून काढला.खूशबू ही पक्षाची साधी कार्यकर्तीही नसल्याचे स्पष्ट केले होते.

परवा प्रशांत दिघेला युवासेनेचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र हे खा. बारणेंच्या हस्ते देण्यात आले.त्यानंतर त्याचे खरे बॅकग्राऊंड समजताच शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी त्याचा प्रवेश स्थगित करणारे पत्र काल काढले.दिघेची पार्श्वभूमी माहिती नव्हती.तसेच काळेवाडीतील पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने त्याला प्रवेश दिल्याची सारवासारव त्यात त्यांनी केली आहे. दिघेचा पक्षाशी कोणताही सबंध नसल्याचे सांगत तो कुठल्याही पदावर नसल्याचेही त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश केलेली त्याची पत्नी खुशबू व समर्थकांचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीचे गणित जुळविताना `भरती`च्या नादात खा.बारणे व पक्षावर ही नामुष्कीची पाळी आली.स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिघेविषयीची माहिती दडवून ठेवल्याने आणि प्रवेश घेणाऱ्याची पार्श्वभूमी न पाहता पद दिले गेल्याच्या या प्रकाराची खा. बारणेंनी गंभीर दखल घेतली आहे. सध्या ते दिल्लीत आहे. ही घटना कळताच ते शहरात येणार असून येत्या मंगळवारी शहर पक्ष पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे त्यांचे पुत्र आणि शहराचे युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांनी सरकारनामाला सांगितले. त्यात पक्षप्रवेश देताना आणि पदवाटप करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली