मुंबई, दि. १२ –
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला जात आहे. नुकतंच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची एक सभा नाशिकच्या वणीमध्ये आयोजित करण्यात आली. वणीमधील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.
“शिंदेंच्या उमेदवारांना २५ कोटी पोहोचले”
“एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांना आतापर्यंत २५ कोटी रुपये पोहोचले आहेत. काही नाक्यांवर सांगोल्यावर पकडण्यात आले. १५ कोटी रुपये पकडले. गाडी कोणाची काही सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे. १५ कोटी पकडले आणि रेकॉर्डवर फक्त ५ कोटी दाखवले. १० कोटींचा हिशोब कुठे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“तपासणीला आमचा आक्षेप नाही”
“उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याला आमचा आक्षेप नाही. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे. मग मुख्यमंत्री, गृहमंत्री कोणीही असतील तरी… पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातून इतक्या बॅगा उतरतात त्या कसल्या असतात? अमित शाहांच्या ताफ्यातूनही बॅगा उतरतात”, असे संजय राऊत म्हणाले.
दोन तासासाठी थांबले मग इतक्या बॅगा कशासाठी?
“लोकसभेच्या वेळी मी स्वत एक व्हिडीओ केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका तासासाठी नाशिकमध्ये गेले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून १५ ते १६ बॅगा उतरल्या होत्या. एक तासासाठी इतके कपडे माणूस घेऊन जातो का? शिंदे शिर्डीला गेले तेव्हाही त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरल्या होत्या, त्या कसल्या होत्या. दोन तासासाठी थांबले मग इतक्या बॅगा कशासाठी? तुम्ही आमच्या तपासण्या करता, मग यांच्या कोणी करायच्या. करणार आहात की नाही. यंत्रणा विकत घेतली गेली का? खोके तुम्हालाही पोहोचलेत? हा आमचा प्रश्न आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.