‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’ – सुप्रिया सुळे

0
102

मुंबई, दि. ६ (पीसीबी) –
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. ‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

शरद पवार, उध्दव ठाकरेंची शेवटची निवडणूक – बावनकुळे

दरम्यान, याच मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि मविआवर घणाघाती टीका केली आहे. खरं राजकारण आता समोर आलंय. सरकारमधील एकनाथ शिंदे चालतात, पण देवेंद्रजी से खैर नाहीं याचा अर्थ काय तो कळतो. एकनाथ शिंदे प्रामाणिक कार्यकर्ता आणि मुख्यमंत्री आहेत. पण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळे देवेंद्रजींना टार्गेट करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जवळ कुणी येईल का? याचा प्रयत्न त्या करत आहेत. मात्र देवेंद्रजी 14 कोटी जनतेच्या मनात आहेत. देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजनार नाही, आपला जातीयवाद चालणार नाही, किंबहुना ही निवडणूक शरद पवार, उद्धव ठाकरे यांची शेवटची ठरेल या भीतीतून सुप्रिया सुळे बोलत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केलीय.

काँग्रेसची जुनी कॅसेट महाराष्ट्रात चालणार नाही –

राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा तोंडाच्या वाफा फेकल्या. अनेक टीका केल्या. मात्र, मध्यप्रदेशात मुख्यमंत्री असताना कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, त्याचं उत्तर राहुल गांधी हे देतील का? नेहरूंच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या उल्लेखबाबत, छत्रपतींच्या वंशजांच्या पुरावे मागणाऱ्यांवबत, राहुल गांधी का बोलले नाहीत? शिवाजी महाराजांच्या बद्दलचे बेगडी प्रेम काल दिसून आले. काँग्रेसला निवडून द्या खटाखट 8 हजार देऊ म्हणाले, पण दिले नाहीत. त्यासाठी त्यांनी काल माफी मागायला पाहिजे होती. राज्य शासनाने महिला भगिनींना सन्मान दिला, म्हणून खोटारडेपणा सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची ही जुनी कॅसेट चालणार नाही, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे