शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुण्यातील शेकडो नेते, कार्यकर्त्यांचं इन्कमिंग

0
3

पुणे, दि . १८ ( पीसीबी ) : येत्या काही महिन्यात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण पेटल आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुणे महापालिकेसाठी मेगा प्लॅन आखला आहे. येथे काही दिवसातच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुण्यातील शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांचं इन्कमिंग होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये महायुती व महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक, तसेच गणेश मंडळ कार्यकर्ते आणि मागील महापालिकेची निवडणूक लढवलेले मात्र पराभूत झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. पक्षप्रवेश सोहळा रविवारी पार पडणार होता. मात्र, मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे, तसेच केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती आहे.

पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही त्याआधी मर्यादित आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना एकसंध असताना आणि शिवसेना फुटल्यानंतर देखील पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने निवडणूक लढवली नाही. तर 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा एकसंध शिवसेनेला केवळ दहा नगरसेवकांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे पुणे शहरात शिवसेनेची ताकद ही मर्यादित असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या फुटी नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहा पैकी केवळ एक नगरसेवक गेला. तर उरलेल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणं पसंत केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्हीही शिवसेनेची ताकद पुण्यामध्ये ही आणखीनच घटल्याचं पाहायला मिळालं.