मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करणाऱ्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आता ३८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. अपक्षांना धरुन हा आकडा ४६ पर्यंत जातो. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मंत्री आणि आमदार फुटून जाण्यापूर्वी या बंडाची कल्पना मुख्यमंत्री, पक्षप्रमुख म्हणून देखील उद्धव ठाकरे यांना कशी आली नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे, खदखद आहे, ही गोष्ट ठाकरे यांच्या लक्षात कशी आली नाही? या बंडामागे उद्धव ठाकरे आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. यावर बोलताना आज उद्धव ठाकरे यांनी, या बंडामागे आपण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जेव्हा या बंडाची कुणकुण माझ्याकडे यायला लागली, तेव्हा मी एकदा एकनाथ शिंदे यांना बोलावलं. म्हंटलं एकनाथजी हे बघा, शिवसैनिकांची, शिवसेनेची, शिवसेनेच्या आमदारांची, जिल्हाप्रमुख, महापालिका यांची काम करण्यासाठी मी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे. पण आता जर त्याचं वळण वेगळं लागतं असेल, तर हे बरोबर नाही.
त्यावर ते म्हणाले, नाही साहेब. पण राष्ट्रवादी काँग्रेस खूप त्रास देत आहे. म्हटलं कोण त्रास देत आहे? त्यांच्या तोंडावर बोलतो. करु एक घाव दोन तुकडे करायचे असेल तर तेही करुया. पुन्हा म्हटले आमदारांचा दबाव आहे, आपण भाजपसोबत गेले पाहिजे. म्हटलं असे कोण आमदार आहेत, आणा त्यांना माझ्या समोर. बघू आपण. मला पटलं आणि त्यांची सगळ्या सैनिकांची इच्छा असेल तर चला भाजपसोबत.
पण म्हटलं जो भाजप आपल्याशी विश्वासघातकीपणाने वागला आहे. आपल्याशी युती तोडली. २०१९ साली आपल्याविरोधात बंडखोर उभे केले, आपल्याला दिलेली वचन त्यांनी नाकारले. त्याच भाजपसोबत जायचं असेल तर मला एका गोष्टींची स्पष्टता पाहिजे. भाजपकडून एक व्यवस्थित प्रपोजल आले पाहिजे, जे सर्वांना मान्य पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे मातोश्रीची बदनामी, कुटूंबाची बदनामी, माझी बदनामी. मी एवढा निर्लज्ज नाही होवू शकत. माझी बदनामी करा, पण कुटूंबीयांची, मातोश्रीची बदनामी केल्यानंतर त्यांच्यासोबत परत जायचं असेल तर मला याबाबत स्पष्टता हवी आहे. तो पर्यंत एकटा यामध्ये येणार नाही, तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही जा. जर सर्वांनी जायचं असेल तर आधी आमदार माझ्याकडे घेवून या. आमदार माझ्याकडे आले असते आणि आज जे बोलतात ते बोलले असते, इथल्या इथे प्रश्न सुटला असता. हक्काने माझ्याकडे का घेवून आला नाहीत? आमदारांची बैठक लावली त्यावेळी त्यांचीही काम मार्गी लावली, असेही ते म्हणाले.
अजून एक संभ्रम ते पसरत आहेत की, या बंडाच्या मागे मी आहे. अजिबात नाही. एवढा मी माझ्या शिवसेनेच्या पाठीत वार करणाऱ्याची औलाद नाही. मी शिवसेना प्रमुखांचा वारसा पुढे घेवून जाणारा आहे. मीच माझ्या पक्षाच्या पाठीत वार करु? आणि जर भाजपसोबत जायचचं असेल तर त्यासाठी मी पाठीत वार का करु? जसे महाविकास आघाडीसोबत जायचा निर्णय उघडं घेतला तसे उघडंपणे भाजपसोबत गेलो असतो ना? यामागे पूर्ण वेगळा डाव आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.