पुणे, दि. ६ (पीसीबी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली असून या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. केंद्राने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शहा काल (शनिवारी) रात्री शहा यांची भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत आढावा, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण या विस्ताराचा मुहूर्त लागत नव्हता. अखेर आत हा मुहूर्तही मिळाला आहे. केंद्रीय नेतृत्वासोबत दिल्लीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. पुढील आठवड्यात हा विस्तार होणार आहे. या विस्तारात कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती, अधिवेशन झाले, पण अद्यापही हा विस्तार झालेला नाही. येत्या आठ ते नऊ महिन्यात आगामी निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नव्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार तर अजितदादा गटाला दोन मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा गट सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे.