शास्तीकर माफीचा आदेश आचारसंहिता संपताच काढणार – देवेंद्र फडणवीस

0
377

सांगवी, दि. २४, (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लावलेला जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला आहे. आचारसंहिता उठताच शास्तीकर माफीचा शासन आदेश काढला जाईल. पुढील दोन महिन्यात आंद्रा धरणातून पाणी मिळेल. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्नही सुटेल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतीली पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर उषा ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शास्तीकर हा जिझिया कर होता. नवीन सरकार आल्यानंतर हा कर रद्द करण्याची विधानसभेत घोषणा केली. शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला. ज्यांनी कर लावला ते विचारता शासन आदेश अजून निघाला नाही. विधानसभेत घोषणा केल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. नाही तर हक्कभंग येतो. त्यामुळे आचारसंहिता उठताच शास्तीकर रद्दचा शासन आदेश काढला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लावलेला जिझिया कर संपून जाईल. पुढील दोन महिन्यात आंद्रा धरणातून पाणी मिळेल आणि पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी, अमृत योजनेच्या माध्यमातून शहरे बदलत आहेत.