शास्तीकराचे समायोजन होणार – आमदार महेश लांडगे यांचा दावा

0
213

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी. प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मालमत्ताधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळाला पाहिजे. अवैध बांधकाम धारकांनी पूर्वी भरलेल्या शास्तीचे समायोजन करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि त्यांनीसुध्दा महापालिका प्रशासनाला त्याबाबतचे आदेश दिले असून त्यामुळे पूर्वी शास्तीकर भरलेेल्या नागरिकांसाठी शास्तीकराचे समायोजन होईल आणि पुन्हा शास्तीकर लागणार नाही, असे आमदार लांडगे यांनी पीसीबी टुडे बरोबर बोलताना स्पष्ट केले.

शहरातील मालमत्ताधारकांवर लादलेला शास्तीकर सरसकट पूर्ण माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानंतर ३ मार्च २०२३ रोजी राज्य सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. १४ वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकराच्या बोजातून सुटका झाली आहे. त्यामुळे शास्तीकर माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला तात्काळ लिखीत आदेश द्यावेत.

ज्या मालमत्ताधारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरला आहे. त्यांना या शास्तीकर माफीचा लाभ देणे गरजेचे आहे. पूर्वी भरलेल्या शास्तीचे समायोजन करण्याबाबत कार्यवाही करावी. सोशल मीडियाच्या माध्यमातून शास्तीकर माफीच्या निर्णयाबाबत समज व गैरसमज याबाबत प्रशासनाने लोकासमोर जागृती करावी. महापालिका प्रशासनाने सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शास्तीकर माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.