“शासन, उद्योग, जनता यांच्या सहयोगातून अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था…”

0
286

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – “शासन, उद्योग आणि जनता यांच्या सहयोगातून अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन पाच ट्रिलियनचे उद्दिष्ट साध्य होईल!” असा विश्वास ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पेठे यांनी काशीधाम मंगल कार्यालय, पवनानगर, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्यक्त केला. संवेदना प्रकाशननिर्मित आणि विनायक सूर्यकांत पारखी लिखित ‘भारत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था अशी होईल…’ या अर्थशास्त्रीय पुस्तकाचे प्रकाशन करताना ओमप्रकाश पेठे बोलत होते. इमर्सन कंपनीचे प्लॉन्ट हेड प्रवीण मोरे, सूर्यकांत पारखी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच साहित्य, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

ओमप्रकाश पेठे पुढे म्हणाले की, “महायुद्धात बेचिराख झालेल्या जपान या देशाने अल्पावधीतच प्रगतीची झेप घेतली. यामागे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली देशभक्तीची भावना महत्त्वाची ठरली. ‘भारत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था अशी होईल…’ या पुस्तकात लेखक विनायक पारखी यांनी सुचविलेल्या बाबी शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योग क्षेत्रात अंमलात आणल्यास अर्थव्यवस्थेच्या गतीला निश्चितच चालना मिळेल!” प्रवीण मोरे यांनी, “वेगवेगळ्या अकरा उद्योगक्षेत्रांचा सखोल अभ्यास करून सिद्ध झालेले हे पुस्तक अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय असून सुलभरीत्या लिहिले आहे!” असे मत व्यक्त केले. लेखक विनायक पारखी यांनी आपल्या मनोगतातून, “पंचवीस वर्षांपूर्वी विविध नियतकालिकांमधून माझ्या अर्थविषयक लेखनाचा प्रारंभ झाला. त्याला सर्वसामान्य ते उच्चपदस्थ अशा सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. माननीय पंतप्रधान यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनचे उद्दिष्ट साध्य करेल, असा विश्वास वेळोवेळी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने उद्योगक्षेत्रांचा अभ्यास केल्यावर ही गोष्ट अशक्य नाही, हे लक्षात आले. सदरहू पुस्तकात त्याबाबत सविस्तर ऊहापोह केला आहे. त्याची शासकीय पातळीवर सत्ताधारी आणि विरोधक यांनी दखल घेतल्यास उद्दिष्ट सहजसाध्य होईल!” अशा भावना मांडल्या.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नितीन हिरवे यांनी प्रास्ताविकातून, “साहित्यनिर्मिती ही लेखकाला अक्षरओळख मिळवून देते!” असे मत व्यक्त केले. संवेदना आणि पारखी परिवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले. वैशाली पारखी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.