‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रचंड खर्च, जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष- अजित पवार

0
221

पुणे, दि. १६ (पीसीबी) – अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट उद्भवलं आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या कामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रचंड खर्च केला जातोय. या कार्यक्रमाचा जनतेला फायदा होतो की नाही हे तर बघायलाच हवं. मी पण मिटींग घ्यायचो, जनता दरबार घ्यायचो. पण मी लोकांचे प्रश्न सोडवायचो. यांचं फक्त राजकारण सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या घराजवळील मैदानात शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व शासकीय योजनांमध्ये दिले जाणारे दाखले, सात-बारा उतारे मोफत देण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा, महापालिका निवडणुकित मतदारांना आकृष्ट करण्यासाठी शिंदे-फडणवीस सराकराने राज्यभर हा उपक्रम हाती घेतला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची टीका महत्वाची आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तयारीचा भाग म्हणून खासदार बारणे आतापासून कामाला लागले आहेत. आपणत युतीचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपने अन्य मतदारसंघावर ज्या पध्दतीने पर्याय म्हणून लक्ष दिले तितके मावळ लोकसभा मतदारसंघाला महत्व दिलेले नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार खासदार बारणे हेच असतील असे समजले जाते.