दि.३०(पीसीबी)-‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची अनुग्रह भूमी, चिंतन भूमी असणाऱ्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांचे भव्य दिव्य असे मंदिर निर्माण कार्य होत असतानाच डोंगराच्या पायथ्याला शंभर एकर परिसरात बालाजी देवस्थानप्रमाणेच भव्य असे कॉरिडॉरचे काम व्हावे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी हजारो कोटी रुपयांचा निधी या कार्यासाठी देईन,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील तुकाराम महाराज बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दिली होती. तीन तास थांबून मंदिराचे काम त्यांनी बारकाईने पाहिले होते, अशी आठवण श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी सांगितली.
‘तुकाराम बीजेच्या दिवशी अजित पवार सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आले होते. त्यांनी संपूर्ण मंदिराच्या आणि कॉरिडॉरच्या आराखड्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली होती. घड्याळाच्या काट्याप्रमाणे वक्तशीरपणे अहोरात्र मायबाप जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे, स्पष्टवक्ते व उमदे नेतृत्व आकस्मिकपणे वेळ चुकवून आपल्यातून हरपले. त्यामुळे अखिल वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्राचीच अतोनात हानी झाली आहे. महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे,’ अशा शब्दांत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. पवार यांच्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरवरील भेटीच्या वेळीची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली.
भारुडाचा कार्यक्रम रद्द
माघ शुद्ध दशमीनिमित्त गेली ७२ वर्षे श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव, गाथा पारायण आयोजित करण्यात येते. या वर्षी हा सोहळा वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला भव्य स्वरुपात साजरा होत आहे. परंतु, बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या निधनाची बातमी येताच सर्व जण सुन्न झाले. वारकऱ्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. नामस्मरणाचा हा यज्ञ असल्याकारणाने बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम रद्द करून इतर सांप्रदायिक कार्यक्रम सुरू होते.







































