शासनाच्या कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

0
281

सरकारी नोकरी वाचवण्यासाठी तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे

उद्या छ. संभाजीनगर पासुन सुरुवात

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – महाराष्ट्र सरकारने नुकताच राज्य शासनातील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आदेश काढला आहे. यासाठी नऊ कंपन्यांना पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. या कंपन्या सरकारमधील काही आमदारांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या असल्याचा आरोप होत असतानाच आता या आदेशाला संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. यात आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील पुढाकार घेत राज्यभर या निर्णयाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाची सुरुवात उद्या छ. संभाजीनगर येथील महात्मा फुले स्मारक, औरंगपुरा येथुन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बरोबरच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विद्यार्थी आघाडी एनएसयुआय तसेच इतर संघटना देखील सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाची माहिती देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की विद्यमान भाजप प्रणित सरकार हे कंत्राटी सरकार असून लोकप्रतिनिधीं पासुन कर्मचारी ते शासकीय संस्था आणि शासकीय उपक्रम या सगळ्यांमध्ये कंत्राटी भरती सुरु आहे. मात्र राज्यातील तरुणांच्या भवितव्यासोबत या भाजप सरकारला आम्ही खेळू देणार नाही. शासकीय नोकरी हा तरुणांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कंत्राटी भरती विरोधात आंदोलन करणार आहे. तरीही सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला नाही तर मुंबई येथे उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत.

कंत्राटी भरती बरोबरच आत्ता पर्यंत झालेल्या सर्व पेपरफुटीची SIT चौकशी करावी, पेपरफुटीवर कठोर कायदा करावा, परीक्षा शुल्क कमी करावे, शासकीय शाळांचे एकत्रीकरण रद्द करावे या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.

कंत्राटी पदभरतीत एखाद्या उमेदवाराची नियुक्ती करताना नेहमी कंत्राटी कंपनीचाच वरचष्मा असेल. यामुळे गुणवत्ताधारक उमेदवारांनाच नोकरी मिळेल किंवा नाही, याबद्दल शंका आहे. महाराष्ट्रातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करत आहेत. अशा निर्णयामुळे त्या सर्व उमेदवारांचे उमेदीची वर्षे वाया जातील. त्याचबरोबर कंत्राटी पदभरतीमध्ये सामाजिक आरक्षणाचा नियम पाळला जाणार नसल्याने काही समाजातील उमेदवाराचे प्रतिनिधित्व कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक- दोन वर्षे कंत्राटी नोकरीनंतर पुढे काय? असा प्रश्न बेरोजगारांपुढे काही वर्षांनी निर्माण होईल, उमेदीची वर्षे कंत्राटी नोकरीत घालवल्यानंतर त्या उमेदवारांना पुढे इतर ठिकाणी नोकरी मिळणे दुरापास्त होईल. बाह्ययंत्रणेकडून नोकर भरतीचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. हा निर्णय सरकारने त्वरित रद्द करून फक्त कायमची नोकर भरती करावी, या मागणीसाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातुन पाठपुरावा करत राहू. तसेच निर्णय न झाल्यास या आंदोलनाला अधिक उग्र स्वरूप दिले जाईल. अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी दिली.