शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरावे; जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आवाहन

0
2

पुणे, दि. 28 (पीसीबी) : रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण लक्षात घेता घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. हिंजवडी परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात यावीत. १ डिसेंबर २०२४ पासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करावी. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन सर्व संबधितांनी करावे, इतरांनाही हेल्मेट वापरण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले.

यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे वाहतुकीचे नियम पालन करण्याकरीता करावयाचे नियोजन, वाहतूक कोंडी टाळण्यासोबतच वाहतूक सुरळीत होण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली.