शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, सुरक्षा यंत्रणा गाफिल, सीसी कॅमेरे बंद, प्रशासन झोपेत

0
367

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक कांबळे असं मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. हुतात्मा चापेकर विद्यामंदिर ही महानगरपालिकेची शाळा आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, शाळेसाठी असलेली सुरक्षा यंत्रणा गाफिल असल्याचे तसेच सर्व सीसी कॅमेरे बंद होते असे निदर्शनास आले असून महापालिका प्रशासन झोपा काढते का, अशी विचारणा नागरिक करत आहेत. भाजपच्या एका आमदाराशी संबंधीत सुराक्षा यंत्रणा असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कांबळे हा इतर मित्रांसह तिसऱ्या मजल्यावर थांबला होता. पायऱ्याजवळ असलेल्या लोखंडी ग्रीलवर आतील बाजूस पाय करून सार्थक बसला. त्याच्या मित्रांनी त्याला असं बसू नकोस, तू खाली पडशील असं म्हणताच तेवढ्यात सार्थक खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.