शाळेच्या सँडविच मधून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा

0
49

डी वाय पाटील शाळेतील घटना

– पालकांची चिंता वाढली

चिंचवड, दि. 11 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर येथे डी वाय पाटील शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेने आयोजित केलेल्या फूड सेशनमध्ये विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या सँडविच मधून विषबाधा झाली. सँडविच खाल्ल्यानंतर शाळेतील सुमारे 350 विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटी असा त्रास झाला. मुलांना विषबाधा झाल्याचे समजल्यानंतर अनेक पालकांनी शाळेत धाव घेतली.

याबाबत माहिती अशी की, चिंचवड मधील शाहूनगर येथे डी वाय पाटील शाळा आहे. शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी फूड सेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शाळेकडून विद्यार्थ्यांना सँडविच आणि चटणी देण्यात आले. सँडविच खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चक्कर, पोटदुखी, मळमळ आणि उलटी असा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता सँडविच खाल्ल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

शिक्षकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. शाळा प्रशासनाने ज्या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाला त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने पालकांची माफी मागितली असून सँडविच आणि चटणी यांची पूर्ण तपासणी करून पुढील कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

“शाळेत अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. 300 ते 350 मुलांना विषबाधा झाली आहे. ही घटना गंभीर आहे. आम्ही सर्व पालकांची माफी मागतो. मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. खाण्याच्या साहित्याची तपासणी केली जाईल. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. शाळा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे.”

अभय खोतकर, संचालक,
डी वाय पाटील शाळा

“18 विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील पाच ते सहा विद्यार्थ्यांना सलाईन लावले आहे. इतर विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आले. ही अन्नातून झालेली विषबाधा आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.”

डॉ. धनंजय पाटील, चेतना हॉस्पिटल


“डी वाय पाटील शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. अन्न निरीक्षक या प्रकरणाची तपासणी करत आहेत. पोलिसांनी शाळा प्रशासन, विद्यार्थी यांचे जबाब नोंदवले आहेत. अन्न निरीक्षकांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.”

गणेश जामदार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे