शाळेच्या कामामुळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; रुग्णांचे हाल

0
198

आकुर्डी, दि. १ (पीसीबी) – आकुर्डी काळभोरनगर मधील बालाजी चौकात शाळेचे बांधकाम सुरू असल्याने आशा किरण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने रुग्णालयाकडे वाहने जात नाहीत. परिणामी, रुग्णांना उचलून नेण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

काळभोरनगरमध्ये आशा किरण हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात गरोदर महिला, विविध रुग्ण दाखल झालेले आहेत. हॉस्पिटलच्या लगत एका शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. कामासाठी साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हॉस्पिटलकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहने हॉस्पिटलकडे जावू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. चालत जावे लागत आहे. वयोवृद्ध रुग्ण, गरोदर महिलांना उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत आहे.

त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत रुग्णांकडून हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार केली जात आहे. रस्ता खराब असल्याबाबत रुग्णांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संवाद चालू आहे. रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हॉस्पिटलमधील डॉ. रोहित शुक्ला यांनी सांगितले.