शालेय विद्यार्थ्यांनी ८ टू ८० पार्क सफरीचा घेतला आनंद

0
423

स्वाक्षरी मोहीम व पत्र लेखनातून स्मार्ट सिटी प्रकल्पांचा नोंदविला अनुभव

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनची ७ वर्षे साजरी करण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरीता पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने पिंपळे सौदागर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ७५ तासांत उभारण्यात आलेल्या ८ टू ८० पार्कला शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच, त्याठिकाणी साकारलेल्या नवकल्पनांची माहिती जाणून घेत विविध खेळांचा आनंद घेतला. प्रसंगी, विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबवून व पत्र लेखनातून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत अनुभव नोंदविला.

या उपक्रमात आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील ७० मुले व मुली यांनी सहभाग नोंदविला. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किरणराज यादव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून संवाद साधला. यावेळी, शाळेचे प्राचार्य सुनील लाडके, शिक्षक अशोक आवारी, चंदन राऊत, उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, फिल्ड इंजिनिअर अतुल फुलझेले, जयेश भदाणे, स्मार्ट सारथीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी मिशनला ७ वर्षे पुर्ण होत आहे. शहर अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि अधिक गतिमान बनविण्यासाठी हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या “सबका भारत, निखरता भारत” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने घेण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प पाहणी दौरा, हवामान जागरूकता मोहीम, नागरी उपायांची अंमलबजावणी, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास केंद्र स्टार्टअपमध्ये नवोपक्रम मेळावा, हरित शहर, नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांजवळ देशी वृक्ष लावण्यासाठी जागृत करणे आदी उपक्रम घेण्यात येत असल्याचे श्री. किरणराज यादव यांनी यावेळी सांगितले.