शाईफेक कऱणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस आणि हत्तीवरुन मिरवणूक.

0
231

 डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या निर्णयाने खळबळ

सांगली, दि. १३ (पीसीबी) : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं राजरत्न आंबेडकर यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. आता डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनीही मोठी घोषणा केलीय.

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथं आयोजित धम्म संमेलनात त्यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गडबडे व त्याचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियानं घेतला आहे.

सांगलीत 23 डिसेंबरला जाहीर सत्कार करणार असल्याचं अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितलं. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. प्रा. कांबळे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी अटकेची कारवाई करुन लोकशाहीलाच आव्हान दिलंय. महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करुन मानसिकता स्पष्ट केलीय, त्यामुळंच शाई फेकून त्यांचा निषेध करणाऱ्या गडबडे यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत. 23 डिसेंबरला सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगता होईल. तद्नंतर शाईफेक करणारे गडबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाईल, असंही प्रा. कांबळेंनी स्पष्ट केलं.