बँक ऑफ बडोदाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा गुणगौरव
पिंपरी, पुणे (दि. ७ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर शहर म्हणून ओळखले जाते. यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाबरोबरच सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष आदर आहे तसेच त्यांचा गुणगौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे बँक ऑफ बडोदाचे विभागीय विकास व्यवस्थापक रजनीकांत चौधरी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन शनिवारी (दि. ५) थेरगाव येथील स्वर्गीय शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी रजनीकांत चौधरी बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, बँक ऑफ बडोदा पीसीएमसी वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अभिषेक परमार, विशेष अधिकारी अशोक धुळेकर, महासंघाचे पदाधिकारी अनिल लखन, सनी कदम, मंगेश कलापुरे, सफाई कर्मचारी अध्यक्ष संजय वाघमारे तसेच बहुसंख्य सफाई कर्मचारी व बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्वागत, प्रास्ताविक करताना बँक ऑफ बडोदा, पीसीएमसी वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अभिषेक परमार यांनी सांगितले की, बँक ऑफ बडोदा सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बचत, गुंतवणूक, विमा तसेच विविध प्रकारचे कर्ज यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा अनेक सुविधा देत असते. याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमार यांनी केले.
सूत्रसंचालन आरती गायकवाड व आभार सुहास आल्हाट यांनी मानले..