शहर स्वच्छतेत महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान; सचिन चिखले यांचे प्रतिपादन

0
305

महिला दिनानिमित्त मनसेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, दि. ०९ (पीसीबी) – महिला कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवत मोठे योगदान आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी सचिन चिखले म्हणाले की, ‘महिला सफाई कर्मचार्‍यांमुळे पिंपरी चिंचवड शहर नेहमीच स्वच्छ व सुशोभित राहिले आहे. कोरोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनमध्येसुध्दा त्यांनी अखंडितपणे आपले कार्य सुरु ठेवले होते. पुरुष कर्मचाऱ्यांसोबतच महिला कर्मचाऱ्यांनी ही आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे सेवा कार्य नियमीत बजावले आहे. त्याबद्दल त्यांचे मानावेत तितके आभार कमीच आहेत. असे चिखले म्हणाले. यावेळी उपस्थित महिला सफाई कर्मचारी यांना खाऊ वाटप करुन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, सर्व महिला सफाई कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे व समाधानाचे भाव दिसत होते. समाजात उपेक्षित असलेल्या आम्हा कामगारांना अशाप्रकारे आपुलकीने बोलावून मनसेने जो आमचा सन्मान केला तो खरंच खुपच कौतुकास्पद असल्याचे सांगून आमच्या सर्वांचे मनोधैर्य वाढल्याचे सर्व महिलांनी सांगितले. याप्रसंगी कैलास मांढरे, जयवंत दूधभाते, शुभम मोरे , आदी उपस्थित होते. .