शहर शिवसेनाला धक्का! आजी-माजी खासदार शिंदे गटात; खासदार बारणे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त

0
268

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता खासदार बारणे यांचे समर्थक आणि आढळराव यांचे समर्थकही शिंदे गटात जातात की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे यांची स्वतःची ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिंदे गटात गेले आहेत. आढळराव यांनी भोसरीचे १५ वर्षे संसदेत प्रतिनिधीत्व केले. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे या आढळराव यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे आल्हाट, उबाळे हे काय भूमिका घेतात. आढळराव यांच्यासोबत शिंदे गटात दाखल होतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतात हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.