शहर भाजपतर्फे मनपा आकुर्डी हॉस्पीटल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

0
288

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : जागतिक बालिका दिनानिमित्त (११ ऑक्टोबर) भाजपा बेटी बचाव बेटी पढाओ आघाडीच्या जिल्हा संयोजक प्रिती कामतीकर यांच्यावतीने मनपाच्या आकुर्डी हॉस्पिटल येथे नुकत्याच जन्मलेल्या पाच बालिका आणि माता यांचे विधिवत पुजन करून जागतिक बालिका दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी, बालिका यांना कपडे आणि त्यांच्या माता यांना साड्या भेट म्हणून देवून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, लाडू भरवून कन्या आगमनाचे स्वागत करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगपात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाजपा प्रवक्ते तथा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, आकुर्डी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बाळासाहेब होडगर, पुनम फके, कांचन डाफने, पल्लवी मारकड, लक्ष्मण टकले, यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रिती कामतीकर म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “बेटी बचाव बेटी पढाओ” या आवाहनाला सर्व समाज बांधवांनी साथ देणे आवश्यक आहे. मुलगा – मुलगी समान मानून मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. घटत्या बाल लिंग गुणोत्तराची ही प्रवृत्ती मागे टाकण्यासाठी आणि याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महिला आणि बाल मंत्रालयाच्या विकास आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने, महिलांच्या सक्षमीकरणामध्ये शिक्षण मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत मुलींच्या संरक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

महिला साक्षरता दर पुरुषांपेक्षा कमी आहे. भारतातील अनेक मुलींची लग्ने लहान वयात होतात. बालमजुरी, सामाजिक दबावामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शाळेपासून दूर केले जाते. मुली अशिक्षित राहिल्याने त्यांना कार्यक्षेत्रात प्रवेश करणे अधिक कठीण होते. परिणामी, त्या कठीण आर्थिक परिस्थितीत सापडतात. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाची सुकन्या योजना आणि महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुलींसाठी “लेक लाडकी योजना” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना मिळणाऱ्या एक लाख रुपयांच्या टप्प्यांची माहिती देखील संयोजिका प्रिती कामतीकर यांनी यावेळी दिली.