शहर भाजपचे डोकं फिरलयं का ?

0
470

थर्ड आय – अविनाश चिलेकर

आज भाजपची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार, मनमानी, घराणेशाहीला तिलांजली देण्याची घोषण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांतून करतात. प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड शहर भाजप या सर्वच मुद्यांमध्ये आकंठ बुडाली आणि पूरती बदनाम झाली. मूळ रा.स्व. संघ संस्कारातील अटल-अडवाणीजींची भाजप राहिलेली नाही. सत्तेसाठी दुसऱ्या पक्षांतून आलेल्या संधीसाधुंनी निव्वळ राष्ट्रवादी, संस्कारक्षम भाजपचे परमिट घेतले आणि राजकारणाचा अक्षरशः धंदा केला. आज निष्ठावंतांची अवस्था एखाद्या घरगड्यासारखी झालीय. निवडणूक कोणतीही असू दे मतांची खरेदी-विक्री करूनच सत्ता मिळते हे सूत्र ज्यांनी वापरले तेच आज भाजपचे मालक झालेत. ज्यांनी आयुष्य या पक्षासाठी वाहिले त्यातलेच काही मोहरे या सरदारांच्या घरात पाणी भरायला आहेत. इतकी केविलवाणी अवस्था आज या पक्षाची झाली. केवळ सत्तेच्या मोहापायी तत्व, न्याय, निष्ठेला तिलांजली देणारी भाजप ती भाजप नसल्याची खंत आहे. सत्तेचा माज, मस्ती अंगात भिनल्याने आता हेच काही लोक लोकशाहिला आणि सर्व यंत्रणेला गुलाम समजू लागतात. घटनेने दिलेल्या स्वातंत्राची हे गळचेपी करू पाहतात. अगदी काल परवाचेच एक उदाहरण घ्या.

चिंचवडच्या भाजपच्या आमदार आश्विनी जगताप आपल्या २० समर्थकांसह तुतारी हातात घेणार, अशी बातमी एका न्यूज पोर्टलने दिली. राजकारणातील एकदम हॉट बातमी म्हणून अनेकांनी त्याच बातमीला कॉपी पेस्ट करून पुढे चालवली. नंतर आमदार आश्विनीताईंनी ही बातमी खोटी असल्याचा खुलासा केला आणि भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांनी जसा आहे तसा तो खुलासा छापला. खरे तर, हे प्रकरण तिथेच संपले होते. एक एक नेता भाजप सोडत असल्याने अगोदरच भाजप हादरली होती आणि त्यात आमदारच विरोधकांकडे जाणार म्हटल्यावर सगळेच हादरले. एक बातमीमुळे भाजपचा शहरातील पायाच हालला. राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर विधानसभेला हवा पालटणार अशी लक्षणे आहेत. परिणामी गेल्या दहा वर्षांत आलेले परतणार आणि भाजप पुन्हा खाली होणार याची धास्ती नेत्यांना लागून राहिली. त्यासाठी अशा बातम्याच येऊ नयेत म्हणून थेट पोलिसांनीच कारवाई करावी, अशी मागणी करणे कितपत रास्त याचा किमान प्रदेशच्या नेत्यांनी विचार करावा. कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. आज मितीला जगताप-लांडगे कुटुंब म्हणजे भाजप हे जे काही समिकरण झाले आहे ते मोडित काढा. भाजपच्या घरात आग लागली म्हणून धूर आला आणि म्हणूनच बातम्या येतात. राजकीय विश्लेषण होणार आणि बातम्याही येणार. होय, चुकिचे असेल तर खुलासा करा, चर्चे करा. लोकशाहिचा एक एक स्तंभ मोडकळीस आणलात. आता चौथ्या स्तंभालाही हात घालायची हिंमत करत आहात. म्हणूनच सामान्य लोक म्हणू लागलेत की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने निघालाय.
२०१७ मध्ये महापालिकेते सत्ता आल्यानंतर भाजपच्या याच नेत्यांच्या कंपुने तिजोरी लुटून खाल्ली. करदात्यांच्या पैशावर डल्ला मारला. हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. स्मार्ट सिटी मध्ये ४०० कोटी खर्च करून शहरात ४५०० हजार सीसी कॅमेरे बसवले ते तीन वर्षे बंद आहेत. आता ज्या मुंबईकर भाजप आमदाराच्या कंपनीने फसवले आहे त्याच्यावर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. शहर इंटरनेटच्या जाळ्यात यावे म्हणून ७०० किलोमीटरची भूमिगत केबल टाकली. ते काम निकृष्ट झाले आणि ३०० कोटी पाण्यात गेलेत. करदात्यांनी इथे भाजपवर फौजदारी दाखल केली पाहिजे. रस्ते साफसफाईसाठी ३५० कोटींचे यांत्रीक साफसफाईचे काम दिले, प्रत्यक्षात काम न करताच ठेकेदार पैसे उकळतोय. पावणे दोन लाख अवैध बांधकामे नियमीत करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपने मतदारांची घोर फसवणूक केली. आता या मतदारांनी भाजपवर फसवणुकिचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तब्बल ६० कोटी खर्च करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या १०० फूट उंचीच्या पुतळ्याच्या उभारणी अगोदरच एका भागाला तडे गेले. या बातम्या दाबण्यासाठी माध्यमांवर दबाव आणणाऱ्या भाजपला आपण मराठी माणसांच्या भावनेशी खेळतोय याचेसुध्दा भान राहिले नाही. सिमेंट रस्त्याला १०० वर्षांचे आयुष्य असते, पाच वर्षांत रस्ते उखडलेत. दिवसाआड पाणी देतो, दोन वर्षांत पाण्याचा प्रश्न सोडवतो, रेडझोन मुक्त करून दीड लाख कुटुंबांचा प्रश्न सोडवतो अशी खोट्या आश्वासनांची जंत्री खूप मोठी आहे. आजवर एकही प्रश्न सुटला नाही. आता त्या बातम्याने भाजपची बदनामी होते म्हणून द्यायच्या नाहीत काय.
खरा प्रश्न हा जगताप कुटुंबातील सत्तासंघर्षाचा आहे. भाजपची विभागणी तिथे झाली. जुने निष्ठावंतांना यापुढेही आमदार म्हणून आश्विनीताई जगताप पाहिजेत. कारण त्यांचा कोणालाही उपद्रव नाही. पैशाने सगळेच विकत घेता येते असा निव्वळ पैशावर राजकारण करणारा एक कंपू आहे. भाजपचे दुकान चालवायचे तर ताई नकोत, असा त्यांचा सूर आहे. या अर्थकारणातूनच भाजपच्या वरिष्ठांचे ऋणानुबंध निर्माण झाले. त्या सर्वांसाठी ताईंच्या एवजी शंकरशेठ उमेदवार पाहिजेत. हा पैसा आणि सत्तेचा खेळ आहे. पुन्हा निवडणूक लढवायची, पुन्हा आमदार व्हायचे, अशी सूप्त इच्छा स्वतः ताईंची होती व आहे. भाजपमधील १५ माजी नगरसेवक त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत. आपली डाळ शिजत नसल्याने त्यापैकीच एक संदीप कस्पटे यांनी राजीनामा अस्त्र काढले. शत्रुघ्न काटे यांच्यासह १५ माजी नगरसेवक त्याच विचारात आहेत. हे जर का जगताप कुटुंबातील अंतर्गत राजकारण भाजपच्या मुळावर येत असेल तर त्याच्या बातम्या होणार आणि येणार. तिथे बदनामीचा प्रश्न येतो कुठे. वाकडचे बडे प्रस्थ राम वाकडकर यांनी भाजप सोडणार म्हटल्यावर पायाखालची वाळू सरकली. भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी कोण हे वाकडकर म्हणून जाब विचारला आणि दुसऱ्याच दिवशी वाकडकर यांची माफीसुध्दा मागितली. आता भाजपच्या या अंतर्गत घडामोडी आहेत. अजून बरीच पडझड होणार आहे, मग बातम्या छापायच्या नाहीत काय. नामदेवराव ढाके यांना पुढे करून पाहुण्याच्या काठीने साप मारायचा प्रयत्न बरा नव्हे. माध्यमांची मुस्काटदाबी करायला जाल तर अंगलट येईल. शेठ, लोकसभा निकाल ही झलक होती अजून विधानसभा, महापालिका बाकी आहे.