शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यात पिंपरी चिंचवड अग्रेसर- आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

0
208

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरांमधील रस्त्यांवर चालणे, सायकल चालविण्यासाठी परिवर्तन सुरू केले आहे. तसेच उडडाणपुलाखालील अडगळीच्या जागा लोकोपयोगी कारणांकरीता विकसीत करीत आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात “रस्ते व सार्वजनिक ठिकाणे नागरिक केंद्रीत विकसीत करणे” या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांमधील जागरूकता वाढविण्यात पिंपरी चिंचवड शहर देशपातळीवर अग्रेसर ठरले आहे. देशभरातील तब्बल ११७ शहरांमधून रस्त्यांचे स्वरूप बदलण्यासाठी नागरिकांना रस्त्यांचे केंद्रबिंदू बनवून एकत्रितपणे परिवर्तनकारी विकास सूरू करून पिंपरी चिंचवडने नवी उंची गाठली आहे. स्मार्ट सिटीज मिशन (एससीएम) अंतर्गत शहरी रस्ते आणि सार्वजनिक जागांवर राष्ट्रीय कार्यशाळांची मालिका भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केली आहे. या कार्यशाळांचा उद्देश प्रत्यक्ष क्षेत्रफेरी आणि तांत्रिक चर्चाद्वारे शहरांमधील परिसंवाद वाढविणे, विशेषतः टिकाऊपणा मॉडेलवर चर्चा करण्यात येत आहे. यामध्ये, मुख्यत्वे रस्त्याचे डिझाईन अंतीम करून त्याचे प्रात्यक्षिक करून वापरकर्त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून अंतीमत: अंमलबजावणी करण्यात येते.

या अगोदर श्रीनगर, कोइम्बत्तूर या शहरामध्ये अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवड येथे या मालिकेतील तिसरी कार्यशाळा दि. १२ व १३ जानेवारी, २०२४ रोजी ग.दि.माडगूळकर प्रेक्षागृह, निगडी येथे होणार आहे. या कार्यशाळेदरम्यान “फ्रीडम टू वॉक सायकल रन” या कार्यक्रमामधील विजेत्या शहरांसाठी पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी १०० स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये स्ट्रीट डिझाईनची उजळणी, डेटा आणि डिझाईनवर चर्चा, डिझाईन सोल्युशन, पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावरील कायापालटाचा प्रवासाविषयी विविध सादरीकरण, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके व स्थळ पाहणी, पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड येथील कार्यशाळा रस्त्यांच्या विकासाच्या विविध पैलूंवर आधारित आहे. शहरांचे शाश्वत विकासासाठी दूरदर्शी कार्यक्रमाचा भाग म्हणून शहरी विकासाच्या पद्धतीत बदल घडविण्यात येत आहेत. तसेच, समस्या निवारण चाचणी या प्रयोगांमधून फ्रीडम 2 वॉक सायकल रन (F2WCR) मोहीमेच्या माध्यमातून पायी चालणे, सायकल चालणे आणि धावणे या दैनंदिन सवयी स्वीकारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.