शहरात 6 हजार पर्यावरण पूरक मालमत्तांची ऑनलाइन नोंदणी; 32 लाखांची भरघोस सवलत

0
336

सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांची माहिती

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातीलऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी कार्यान्वीत आणि झिरो वेस्ट राबविणाऱ्या 5 हजार 991 पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या मालमत्तांसाठी सामान्य करात विविध कर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या मालमत्ता धारकांना वर्षभरात तब्बल 32 लाख रुपयांची भरघोस अशी सवलत मिळणार आहे. 3 हजार 349 पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांनी 30 जूनअखेर 4 कोटी 5 लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

याबाबतची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 78 हजार मालमत्तांची नोंद आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख मालमत्ता धारकांनी260 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. शहरातील 24 सोसायट्यांसह 107 जणांनी पर्यावरण पूरक सोसायटी आणि बंगला असल्याबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये 5 हजार 991 फ्लॅट आणि बंगले आहेत. या सर्व पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांना तब्बल 32 लाख रुपयांची सवलत मिळणार आहे.

काय आहे पर्यावरण पूरक सवलत योजना?-
ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा (ओला कचरा पूर्णत: जिरविणाऱ्या) -5 टक्के, एसटीपी कार्यान्वीत असल्यास – 3 टक्के, ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा आणि एसटीपी कार्यान्वीत असल्यास -8 टक्के, झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत असल्यास (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणाऱ्या) -8 टक्के, झिरो वेस्ट आणि एस.टी.पी. कार्यान्वीत असल्यास (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणाऱ्या ) – 10 टक्के.

सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, पर्यावरण पूरक सोसायट्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कर संकलन विभाग प्रयत्न करत आहे. पर्यावरण पूरक सोसायटी धारकांसाठी नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 पासून शहरातील 6 हजार पर्यावरण पूरक सोसायट्यांची नोंदणी केली आहे. पर्यावरण पूरक सोसायट्यांसाठी वर्षभर सवलत योजना उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत- जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. सोसायट्या पर्यावरण पूरक कराव्यात.